मुंबई पुणे मुंबई ३ सिनेरिव्ह्यू

Business News

सरळ, साधी, सोपी कथा. सोपी म्हणजे एवढी, की पुढे काय होणार याची आपल्याला सुरुवातीलाच कल्पना येते. कोणतीही वळणे, धक्के न देता ‘मुंबई पुणे मुंबई ३’ हा चित्रपट सरळ मार्गाने चालत राहतो आणि तरीदेखील प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. हे यश दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि सर्वच कलाकारांचे आहे. शेवट माहीत असलेली गोष्ट सांगणे अवघड असते. ती अवघड गोष्ट हे सारे चांगल्याप्रकारे निभावतात.

‘मुंबई पुणे मुंबई’च्या दुसऱ्या भागाचा धागा पकडून चित्रपट सुरू होतो. आता गौतम (स्वप्नील जोशी) आणि गौरी (मुक्ता बर्वे) यांचा संसार सुरू झाला आहे. ठरविलेल्या मार्गावरून आणि सारे काही आधी ठरवून त्यांचा प्रवास सुरू आहे. घर आणि करिअर या दोन्हीत हे दोघे गुंतलेले आहेत. तोपर्यंतच्या धडपडीला फळ मिळाले आहे आणि आता करिअरची गाडी सुसाट सुटेल, अशा वळणावर ते आहेत. याच वळणावर त्यांनी अजिबात न ठरविलेली, विचार न केलेली गोष्ट समोर येते. ते आई-बाबा होणार असल्याचे समजते. हा त्यांच्यासाठी धक्का असतो. या बातमीमुळे त्यांचे कुटुंबही साऱ्याच निर्णयात, पुढील गोष्टींत सहभागी होते आणि कथा पुढे सरकते.

आपण पालक होण्यास तयार नाही, ती जबाबदारी आत्ता नको, असे का वाटत असावे, याचा विचार दिग्दर्शक करतो. घरच्यांच्या मार्फत का हवे, या प्रश्नाला उत्तर देऊ करतो. शेवटी लग्न आणि त्यानंतर कुटुंबाचा विस्तार ही केवळ त्या दोघांपुरती मर्यादित बाब नसते. ती दोन घरांची असते. त्याचवेळी आपला निर्णय बरोबर आहे की चूक, आपण म्हणतो आहोत ते योग्य आहे की अयोग्य, अशा चक्रात ते जोडपे सापडते. निर्णय घेतला जातो, त्यानंतर मात्र कसोटी सुरू होते. ही कसोटी त्या दोघांची असली, तरी आईची जास्त असते. कितीही म्हटले, तरी आई त्या जिवाशी नाळेने जोडलेली असते. आपल्या गर्भात ती त्याला सांभाळत असते. वडील त्यामानाने सुटे असतात. त्यांच्यावरही जबाबदारी असते, त्यांना त्या गोष्टीचा ताणही येतो; परंतु आई आणि बाबा यांच्यामध्ये मूलभूत फरक राहतोच. तोच फरक या चित्रपटातही दिसतो. तिच्या भावना, भावनांचे चढउतार, तिला एकटे वाटणे, सगळ्यातून बाजूला गेल्यासारखे वाटणे, हाती असलेले चांगले करिअर आता सुटते की काय आणि आपला नवरा आपल्याकडे पूर्वीसारखेच लक्ष देईल ना, अशी भीती वाटणे, तोपर्यंतच्या जगण्यातील खूप साऱ्या गोष्टी आता सुटल्या आहेत, काही सोडाव्या लागणार आहेत, तोपर्यंत दोघांचेच असणारे जग विस्तारते आहे आणि आता ही जन्मभराची जबाबदारी आहे, ही गोष्ट तिला घाबरवून सोडते. तिचे हे सारे हिंदोळे मुक्ता बर्वे अतिशय सुंदर पद्धतीने मांडते. तिचा चेहरा विलक्षण बोलका असल्यामुळे आणि अभिनयात सहजता असल्यामुळे त्या साऱ्या भावनांशी जोडले जाणे प्रेक्षकांनाही सहज होते. स्वप्नील जोशी तिला उत्तम साथ देतो. गौतम बोलका असला, तरी आत जे काही होते आहे, ते सांगता येत नाही. मुळात स्वत:ला नीटसे समजतही नाही, ही अवस्था स्वप्नील छान मांडतो. या दोन मुख्य पात्रांनी आपापल्या भूमिका आणि त्यातील सहजता जपल्यामुळे ‘प्रसुती सुलभ’ होते. त्यांना साऱ्या कलाकारांची उत्तम साथ लाभली आहे. प्रशांत दामले यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. हे गौतमचेच बाबा, हे प्रेक्षक मान्य करून टाकतात. विनोदाची साधलेली अचूक वेळ, ही त्यांची खासियत. ती येथेही निदर्शनास येते. सतीश राजवाडे हा दिग्दर्शक नातेसंबंधांचा खोलवर विचार करतो. या चित्रपटाच्या पहिल्या भागात दोन अनोळखी समोर आले होते, दुसऱ्या भागात त्यांनी लग्नाविषयी मनात असलेले प्रश्न, मुलीचा उडणारा गोंधळ, मुलाला वाटणाऱ्या गोष्टी सांगितल्या होत्या. तिसऱ्या भागात ते आई-बाबा होणे म्हणजे काय आणि ते पेलणे म्हणजे काय हे सांगू पाहतात. आधीच्या भागात दोघांची घरे दिसली होती. या भागात गौतम आणि गौरीचे घरही दिसते. त्याची सजावट विचारपूर्वक केली आहे. या दोघांचा वावर, त्यांचे परस्परांतील गाढ प्रेम घरातूनही दिसते.

चित्रपटातील काही दृश्य लांबल्यासारखी वाटतात, काही ठिकाणी अपेक्षित ते सारेच समोर येत असल्यामुळे त्यातील गंमत गेल्यासारखे वाटतेही; परंतु कलाकार, कथा आणि संवादांतून ही छोटीशी दरी भरून निघते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *